पाकिस्तानी क्रिकेटपटूची MS धोनीवर स्तुतीसुमने !

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचे 2019 विश्वचषक स्पर्धेत आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या संपूर्ण स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीचा संथ खेळ हा मुद्दा कायम चर्चेत राहिला. त्यामुळे विश्वचषकानंतर निवड समितीने मोठें पाऊल उचलत धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. दुसरीकडे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही सुरूच आहेत. अशातच पाकिस्तानचा खेळाडू कमरान अकमल याने धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याची धावा करण्याची सरासरी 50पेक्षा अधिक आहे. त्याच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. पाकिस्तानात आमच्या तोंडचा घास पळवून न्यावा तशी त्याने क्रिकेट मालिका भारताला जिंकवून दिली होती. धोनीची प्रतिभा अविश्वसनीय आहे. धोनीच्या प्रतिभेबद्दल अधिक बोलायचे झाले तर वन डे विश्वचषक, टी 20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वाखाली त्याच्या हाताखालील संघाने सर्व प्रकारच्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनी हा खरंच एक अप्रतिम खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये धोनीसारखे खेळाडू कमीच पाहायला मिळतात, असे अकमल म्हणाला.