‘मासिक पाळी’ येत असेल तर 14 वर्षांच्या मुलीचा विवाह ‘वैध’, न्यायाधीशांनी सांगितलं

कराची : वृत्तसंस्था  – पाकिस्तानच्या दोन न्यायाधीशांनी 14 वर्षांच्या मुलीशी संबंधीत एका प्रकरणात सुनावणी करताना म्हटले की, जर मुलीला पहिली पाळी आली असेल तर तिला प्रौढ मानले जाईल. हुमा यूनुस नावाच्या कॅथेलिक मुलीच्या वडीलांनी आरोप केला होता की, कराचीमध्ये त्यांच्या घरातून मुलीचे अपहरण करण्यात आले होते. नंतर हुमाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला.

14 ऑक्टोबर 2019 ला ही अपहरणाची घटना घडल्यापासून हुमाचे पालक तिला भेटू शकलेले नाहीत. या प्रकरणाची सुनावणी सिंध हायकोर्टाचे न्यायाधीश मुहम्मद इकबाल कलहोरो आणि इरशाद अली शाह करत आहेत.

याच आठवड्यात प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी म्हटले की, जर हुमाला पहिली पाळी आली आहे तर इस्लामिक शरिया कायद्यानुसार तिला प्रौढ समजले जाईल आणि अब्दुल जब्बार सोबतचा तिचा विवाह वैध मानला जाईल. कारण आता हुमाचे म्हणणे आहे की तिने कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वच्छेने विवाह केला आहे.

दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या टिपण्णीने हुमाच्या पालकांना जबरदस्त धक्का बसला आहे. हुमाचे वडील यूनुस मसीह यांनी म्हटले की, आम्हाला धक्का बसला आहे की न्यायाधीशांनी आमच्या पुराव्यावर विचार केला नाही आणि विवाह वैध ठरवण्यासाठी शरिया कायद्याचा हवाला दिला.

हायकोर्टाने अजून अंतिम निर्णय दिलेला नाही. कोर्टाने 3 फेब्रुवारीला प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर अधिकार्‍यांना हुमाचे वय ठरविण्यासाठी आणखी वेळ दिला. आता या प्रकरणाची सुनावणी 3 मार्च 2020 ला होणार आहे.