PM इम्रान खानचं काऊनडाऊन सुरू ! लोकांनी सरकार ‘बिनकामी’ असल्याचं म्हणत Ex PM नवाज शरीफचं नाव काढलं

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झालेला पाकिस्तान आता महागाई आणि कंगाली लपविण्यासाठी अनेक पद्धती अवलंबत आहे. इम्रान खान यांचा दृष्टीकोन आणि कार्यपद्धती पाकिस्तानी लोकांना अजिबात पटत नाहीये. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या पाकिस्तानच्या लोकांनी इम्रान खानवर जोरदार हल्ला चढविला आहे.

या सरकारने अक्षरशः रस्त्यावर आणल्याचा आरोप पाकिस्तानच्या लोकांनी केला आहे. तेथील लोक आता इम्रानच्या विरोधात उघडपणे पुढे येत आहेत. ते म्हणतात की इम्रान खान यांनी देशाबद्दल काहीच विचार केला नाही. भविष्यासाठी कोणतीही रणनीती नाही, देश बेरोजगारीला तोंड देत आहे आणि महागाई येथे शिगेला पोहोचली आहे. मात्र इमरान खान अजूनही गप्पांचे चौकार आणि षटकार लावण्यातच व्यस्त आहेत.

माध्यमांशी बोलताना तेथील एका व्यक्तीने सांगितले की, ‘देशात रोजगार नाही. जनता नाराज आहे, सरकार मोठ्या प्रमाणावर कर आकारत आहे. हे सरकार श्रीमंत लोकांना सोडून देते आणि गरिबांनाच पिडत आहे.

नवाज इम्रानपेक्षा चांगले होते :
आणखी एक पाकिस्तानी नागरिक म्हणाला, पीआयए एका तासामध्ये ४ लाख रुपयांचे नुकसान करीत आहे. लोक म्हणत आहेत की हे सरकार ज्याला चोर म्हणत आहे ते नवाज शरीफ यांनाच आणा. इमरान खानपेक्षा नवाज चांगले आहेत. ते बिझिनेस माइंडड आहेत आणि कुशल प्रशासक आहेत तर इम्रान खान मात्र लोकांना रस्त्यावर आणत आहे. नवाज व्यावसायिक आहेत आणि ते देशासाठी अधिक चांगले काम करतील आणि इम्रान मात्र फक्त चौकार आणि षटकारांबद्दल बोलत आहे. इथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि हीच परिस्थिती कायम राहिल्यास आपण उद्ध्वस्त होऊ असे पाकिस्तानचे लोक म्हणतात.

पाकिस्तानात सत्तांतराची शक्यता :
पाकिस्तानची अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने पुढाकार घेतल्यानंतर सैन्याने सरकारच्या कामात हस्तक्षेप वाढवला आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मतानुसार इम्रान यांची सत्ता उलथून टाकण्याची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्या आदेशानुसार येथील सैन्याच्या १११ ब्रिगेडच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांचे मत आहे की पाकिस्तानात १११ ब्रिगेड नेहमीच सत्ता उलथून टाकण्यासाठी वापरली गेली आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की जनरल बाजवा यांनी पाकिस्तानच्या बड्या उद्योजकांशी एक गुप्त बैठक घेतली आहे. या दोन्ही घडामोडी लक्षात घेता पाकिस्तानात सत्ता उलथून टाकण्याची योजना असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.