काय सांगता ! : होय, पाकिस्तानी खासदार आणि जमीयतचे 62 वर्षीय नेते मौलाना सलाहुद्दीन यांनी केलं 14 वर्षीय मुलीशी ‘लग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पाकिस्तानातील एका ६२ वर्षीय धार्मिक आणि राजकीय नेत्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसह निकाह केला आहे. मौलाना सलाहुद्दीन अयुबी असे या नेत्याचे नाव असून तो पाकिस्तानच्या जमियत उलेमा- ए- इस्लाम पक्षाकडून खैबर पख्तुन्ख्वा राज्याकडून पाकिस्तानी संसदेत सदस्यही आहे. दरम्यान, पाकिस्तानात मुलींच्या लग्नाचे वय १६ वर्ष निश्चित करण्यात आले आहे. परंतु, अयुबीने गेल्या वर्षी संबंधित अल्पवयीन मुलीशी निकाह केला आहे.

स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, मुलगी पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवर असणाऱ्या खैबर पख्तुन्ख्वा राज्यातील चित्राल भागातील रहिवासी आहे. जिथे जमियतचा मोठ्या प्रमाणात दबदबा आहे. त्यामुळे मौलानाचा हा कारभार जगाच्या समोर आला नाही. तो आधीपासूनच विवाहित आहे. त्याने २०१८ मध्ये नॅशनल असेम्ब्ली सीट नंबर २६३ (किल्ला अब्दुल्लाह) येथून निवडणूक जिंकली होती आणि खासदार बनला होता.

एनजीओच्या तक्रारीवरून प्रकरणाचा उलगडा

माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेने पोलिसांना याविषयी माहिती दिली असता हे प्रकरण उघडकीस आले. ही मुलगी जुगूरमधील सरकारी शाळेत शिकत होती आणि तिची जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 अशी नोंदविण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. चित्राल पोलिस स्टेशनचे एसएचओ निरीक्षक सज्जाद अहमद यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर आम्ही तपास सुरू केला आहे.

दरम्यान, मुलीच्या वडिलांनी आधी लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर जेव्हा सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ लागल्या तेव्हा त्यांनी कबूल केले की हे लग्न गेल्या वर्षी झाले होते. पण मुलीची विदाई जेव्हा ती 16 वर्षांची होईल तेव्हाच केली जाईल. दरम्यान, तोपर्यंत मौलानाही 64 वर्षांचे झाले असेल.

मौलानाने स्वीकार केली निकाहची बातमी,

निरीक्षकाच्या म्हणण्यानुसार खासदाराने मुलीशी निकाह झाल्याची पुष्टी केली आहे , तर योग्य विवाहसोहळा अजून बाकी आहे. पाकिस्तानात लग्नासाठी मुलीचे वय 16 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तेथील कायदा यासाठी पालकांनाही शिक्षेची शिफारस करतो.