काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानी गायिका राबी पिरजादा ‘बावचळली’, भारत आणि PM मोदींना दिली ‘Snake Attack’ ची धमकी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला.

त्याचबरोबर पाकिस्तान विविध राष्ट्रांकडे याप्रकरणी मदत मागत असून सध्या पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारताला अनेकदा युद्धाच्या धमक्या देखील दिल्या. यामध्ये कुणीही मागे नव्हते. पंतप्रधान इम्रान खान यांच्याबरोबरच अनेक मंत्र्यांनी देखील भारताला युद्धाची धमकी दिली.

त्यानंतर आता पाकिस्तानमधील गायक राबी पीरजादा हिनेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हल्ल्याची धमकी दिली आहे. मात्र तिने हत्यारांच्या हल्ल्याची धमकी दिली नसून तुम्ही तिची धमकी ऐकल्यानंतर तुम्हाला हसून आवरणार नाही. तिने ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड केला असून यामध्ये ती विषारी साप आणि मगरींबरोबर दिसून येत आहे.

यामध्ये ती धमकी देताना म्हणत आहे कि, एक काश्मिरी मुलगी आपल्या सापांसह तयार आहे. हे साप मोदींना गिफ्ट केले जाणार आहेत. आता मरण्यासाठी तयार रहा. त्यानंतर तिने काश्मीरच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी एक गाणे देखील म्हटले. याआधी देखील तिने भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते.

दरम्यान, या व्हिडिओत ती काश्मीर हे पाकिस्तानचे असल्याचे म्हणत असून यामध्ये ती या निर्णयानंतर प्रचंड संतापलेली दिसून येत आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्याप्रमाणेच डोळे बंद करून तीदेखील भारतावर हल्ला करत आहे.