‘इम्रान खान यांना शांततेचं नोबेल द्या’ : पाक संसदेत प्रस्ताव सादर

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – दहशतवादाला थारा देणाऱ्या, अनेकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताननं जागतिक रोषापासून स्वत:ला वाचवण्यासाठी नवी खेळी केली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी इम्रान खान यांनी पाऊल उचलले म्हणून इम्रान खान यांना नाेबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी पाकिस्तान सरकारने केली आहे. तसा प्रस्ताव पाकच्या संसदेत सादर करण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. यानंतर मात्र भारतीय हवाई दलाने कारवाई करत तेथील दहशतवादी तळं उध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानने त्यांची तीन विमाने लष्करी हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना पिटाळून लावताना भारताचं मिग-21 हे लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. यानंतर यातील पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्याआधी त्यांना पाकच्या नागिरकांकडून मारहाणही करण्यात आली होती. यानंतर लष्कराकडून पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे संकेतही दिले होते. यानंतर बिथरलेल्या इम्रान खान यांनी शांततेचं आवाहन करत भारतीय पायलटला सुखरूप सोडण्याची घोषणा केली. त्यानुसार काल अभिनंदन हे भारतात दाखल झाले.

खरंतर भारताचा संभाव्य हल्ला व जागतिक दबाव या गोष्टींपुढे झुकत पाकने अभिनंदन यांची सुटका केली. इतकेच नाही तर, अभिनंदन हे युद्धकैदी होते त्यामुळे जिनिव्हा करारानुसार, त्यांना अभिनंदन यांना भारतात परत पाठवणे बंधनकारक होते. त्यामुळे पाकने अभिनंदन यांची सुटका करून भारतावर उपकार केले नाही असंही माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांनी सांगितले होते. शिवाय 1971 नंतर भारताने पाकच्या जवळपास 90000 युद्धकैद्यांना सोडले होते असेही माजी लष्कर प्रमुख व्ही के सिंग यांनी सांगतिले होते. याउलट दोन्ही देशातील शांततेसाठी इम्रान खान यांनी हे पाऊल उचललं असं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे. पाकचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत प्रस्ताव आणताना हीच भूमिका मांडल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर, इम्रान खान यांनी शांततेसाठी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे असंही चौधरी यांनी म्हटले आहे.

पाकचा शांततेचा बुरखा टरकन फाटला !

पाकिस्तानने ओढलेला शांततेचा बुरखा लगेचच फाटल्याचे दिसून आले. अभिनंदन यांना पकडल्यापासून ते त्यांना सोडेपर्यंत तसेच पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांना नोबेल देण्याचा प्रस्ताव येत होता त्यावेळी सीमेवर पाक लष्कराकडून गोळीबार सुरु होता. दोन दिवसांत जवळपास 70 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यामुळं पाकच्या या मागणीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर कितपत घेतली जाते, याविषयी साशंकता आहे.