पाकिस्तानातील ‘हे’ मंदिर, जिथं हिंदूंना देखील जाण्यासाठी बंदी, केअरटेकर देखील मुस्लिम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पहिले हिंदू मंदिर होत असल्याने वाद सुरू आहे. अनेक मुस्लिम संघटना याविरोधात आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे यांची दुर्दशा लपून राहिलेली नाही. यापैकी एक आहे इस्लामाबादमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले सोळाव्या शतकातील एक राम मंदिर. 14 वर्षांच्या वनवासात भगवान राम, सीता आणि लक्ष्मणासोबत येथेच राहात होते, असे मानले जाते. यानंतर इथे मंदिर बांधण्यात आले.

शतकांपासून या राम मंदिरात पूजा करण्यासाठी अनेक दूरच्या ठिकाणांवरून हिंदू येत आहेत. हे भाविक शांतिपूर्वक या धर्मशाळेत राहतात, ज्यास सध्या सैदपुर गाव म्हटले जाते. अधिकृत रेकॉर्डनुसार, 1893 पर्यंत येथे एका तलावाजवळ दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जात होते. असे मानले जाते की, भगवान श्रीरामांनी एकवेळ या तलावातून पाणी प्यायले होते. आता हा तलाव दुर्गंधीयुक्त नाला झाला आहे.

1947 च्यानंतर, हिंदूंना या मंदिरात आणि त्या परिसरात पूजा करण्यास रोखण्यात आले. हे मंदिर पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे, परंतु मंदिरातील सर्व मूर्ती हटवण्यात आल्या आहेत. आता या तिर्थस्थळावर रेस्टॉरंट आणि हस्तशिल्प दुकाने उघडण्यात आली आहेत.

येथील हिंदू कार्यकर्ते सवाई लाल यांनी अरब न्यूजला सांगितले की, सरकारने हे ठिकाण वारसा म्हणून जतन केले आहे. परंतु, या परिसरात रेस्टॉरंट आणि दुकाने चालवण्याची परवानगी देऊन जागेच्या पावित्र्याचे उल्लंघन केले आहे.

मंदिर परिसराची देखभाल करणार्‍या मुहम्मद अनवरने म्हटले की, हे क्षेत्र आता वारसा स्थळ बनले आहे. येथे हिंदूंना पूजा करण्याची परवानगी नाही. कधी-कधी लोक येथे पूजा करण्याची मागणी करतात, पण आम्हाला त्यांना रोखावे लागते.

पाकिस्तानच्या बहुतांश अल्पसंख्यांना वाटते की, सरकार त्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, आणि कधी-कधी त्यांना येथे हिंसेचा सामनासुद्धा करावा लागतो. इस्लामाबादमध्ये नवीन मंदिराच्या बांधकामाला विरोध होत असताना येथील हिंदू पुन्हा एकदा प्रसिद्धीत आहेत.

येथे अल्पसंख्यांकाची संख्या खुपच कमी आहे. सवाई लाल यांनी म्हटले की, काही कट्टरपंथियांनी इस्लामाबादमध्ये आमच्या मंदिर स्थळाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर आम्ही भितीच्या छायेत आहोत. सध्या इस्लामाबादच्या 3,000 हिंदुंसाठी एकही मंदिर नाही.

1960 मध्ये हा राम मंदिराचा परिसर गर्ल्स स्कूलमध्ये बदलण्यात आला. वर्षानुवर्षे येथे असलेल्या हिंदू समाजाच्या विरोधानंतर, हे स्कूल दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आणि मंदिर 2006 मध्ये खाली करण्यात आले, परंतु हिंदूंना तेथे पूजा करण्याची परवानगी नाकारली.

पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे संरक्षक प्रमुख रमेश कुमार वांकवानी यांनी म्हटले की, सध्या इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डमध्ये नोंदणीकृत एकुण 1,288 हिंदू मंदिरांपैकी केवळ 31 मंदिरात लोक दर्शनासाठी जाऊ शकतात. हे बोर्ड फाळणीच्या दरम्यान पाकिस्तान सोडून भारतात गेलेल्या लोकांनी सोडलेल्या संपत्तीची देखरेख करते.

वांकवानी यांनी म्हटले की, आम्हाला आमच्या सध्याच्या मंदिरांच्या जिर्णोद्धाराची परवानगी दिली पाहिजे. येथील हिंदू नेत्यांचे म्हणणे आहे की, मागच्या आठवड्यात राजधानीमध्ये नवीन मंदिराचे बांधकाम सुरू झाल्याने आशा वाढली होती. परंतु, मौलवींच्या विरोधानंतर आता पंतप्रधानांच्या अंतिम मंजूरीची वाट पाहात आहेत, जेणेकरून बांधकाम पुन्हा एकदा सुरू करता येईल.