पाकिस्तानहून करोडो रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणारी बोट उडवली ; ९ ड्रग्ज माफियांना अटक

पोरबंदर : वृत्तसंस्था – भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या पोरबंदरजवळ पाकिस्तानकडून अमली पदार्थांची तस्करी करणारी बोट भारतीय तटरक्षकदलानं उध्वस्त केली आहे. यामध्ये ९ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तर तब्बल ५०० कोटींचे १०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पाकिस्तानच्या हमिद मलिक नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत आहे. पाकिस्तानमधून भारतात अमली पदार्थ पाठवण्याची जबाबदारी ही हमीदकडे होती अशी माहितीही एटीएसकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ३ दिवसांपासून गुजरात एटीएस पोरबंदराजवळ गस्त घालून होती. पाकिस्तानमधून भारतात समुद्रामार्गे अमली पदार्थ पोहचवले जात असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली. कोट्यवधीचे अमली पदार्थ घेऊन एक पाकिस्तानी बोट पोरबंदरजवळ भारतीय सागरी हद्दीत घुसली होती. या बोटीबाबत संशय आल्यावर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत या बोटीला घेरले. त्यानंतर या बोटीतील नऊ ९ ड्रग्ज माफियांना ताब्यात घेण्यात आले. मात्र कारवाई सुरू असताना बोटीत असलेल्या काही जणांनी बोटीला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले.

दरम्यान, पाकिस्तानमधून पोरबंदर येथे आणण्यात येत असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठवण्यात येणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.