Coronavirus : पाकिस्तानमध्ये चक्क कचर्‍याच्या ढिगार्‍या शेजारीच बनवलं ‘क्वारंटाईन कॅम्प’, सर्वत्र इमरान खान ‘ट्रोल’ (व्हिडीओ)

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानात मागील तीन दिवसांपासून कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 304 वर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या इमरान खान सरकारने इराणजवळील सीमेवर कोरोनाग्रस्तांसाठी जे क्वारंटाईन कॅम्प उभारले आहेत. त्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

एका वृत्तानुसार, या क्वारंटाईन कॅम्पचा दर्जा तर खराब आहेच याशिवाय हे कॅम्प कचऱ्यांच्या ढिगाऱ्यापाशी तयार करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या कॅम्पचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कोरोनाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सिंध प्रांताच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते मरीन युसूफ यांच्या मते पाकिस्तानमध्ये कोरोनाची प्रकरणं खराब व्यवस्थेमुळे नाही तर पॉझिटिव्ह लोकांना आजाराची आवश्यक माहिती नसल्याने वाढत आहेत.

इमरान खान सरकारवर प्रश्नांची सरबत्ती – 
इराण सीमेवर स्थित ताफ्तान कॅम्पच्या लोकांनी सांगितले की येथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, खाण्यापिण्याची मोठी समस्या आहे. पाकिस्तानने कोरोनासाठी जी प्रोसिजर तयार केली आहे ज्यात पॉझिटिव्ह रुग्णाच्या कोणी व्यक्ती संपर्कात आल्यास त्या व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह जरी आली तरी त्यांना 14 दिवस क्वारंटाईन कॅम्पमध्ये ठेवण्यात येईल.

परंतु क्वारंटाईन कॅम्पच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ता लियाकत शहवानी यांनी स्पष्टीकरण दिले की डब्ल्यूएचओने सांगितलेल्या नियमानुसार सर्व काम केले जात आहे.

तर कॅम्पमध्ये राहणाऱ्या आमिर अली यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी तेथील परिस्थिती सांगितली आहे. त्यांच्या मते कॅम्पमध्ये आता राहण्यासाठी जागा नाही. लोकांना खाण्यापिण्याची आणि औषधांची कमतरता भासू लागली आहे. सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या या फोटोंमध्ये त्या परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता स्पष्ट दिसत आहे.