भूकंपाच्या धक्क्यांनंतरही पालघरमधील शासन यंत्रणा ढिम्म ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे अनेक धक्के जाणवत आहेत. अलीकडे भूकंपाचे सात धक्के बसले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शासनाने उपाययोजना आखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले असले तरी आजवरच्या अभ्यासातील एकही उपाय करण्यात आला नाही.

पालघरमध्ये हैदराबाद येथील भूभौतिक संशोधन संस्थेमार्फत तज्ज्ञांच्या एका गटाला अभ्यासासाठी पाचारण करण्यात आले होते. भूगर्भातील ‘इंडियन प्लेट’ची उत्तरेच्या आणि ईशान्य दिशेने हालचाल होत असल्याने धक्के जाणवत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. डहाणूतील धुंदलवाडी भागात 11 किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर रुंद अशी भूगर्भातील ‘फॉल्ट’ रेष असल्याचे निदान करण्यात आले.
भूगर्भात शिरणारे पावसाचे पाणी या भागात होणार्‍या भूकंपाच्या प्रकाराला कारणीभूत नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. परिसरात असलेल्या इमारतींचे आराखडयामध्ये सुधारणा करण्यातआली. इमारती आणि घरे भूकंपप्रवण क्षेत्राप्रमाणे मजबूत करण्यात यावीत, यासाठी ‘आयआयटी मुंबई’ येथील तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केला. या भागातील 34 शासकीय इमारतींचे ‘रेट्रो फिटिंग’ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. घरांवरील सज्ज्यांचे विशिष्ट पद्धतीने मजबुतीकरण करण्याचा प्रस्ताव आराखडा या समितीने दिला होता. समितीने ‘रेट्रो फिटिंग’चा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असला तरी गेल्या वर्षभरात त्या दृष्टीने कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे.