धक्कादायक ! बिल्डरकडून फसवणूक झाल्याने रिक्षाचालकाने घेतले जाळून, उपजिल्हाधिकारी देखील जखमी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – नालासोपारा येथे एका बिल्डरने फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर प्रक्रियेला कंटाळून एका रिक्षा चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःला जाळून घेत या 57 वर्षीय आत्महत्येचा रिक्षाचालकाने प्रयत्न केला. गणेश भोर असे या रिक्षाचालकाचे नाव असून या घटनेत तो सत्तर टक्के भाजला आहे. रिक्षाचालकाला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले असून या प्रकरणामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी देखील जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारामधील खाजगी बिल्डर चांद मोहम्मद शेख यांच्याकडून भोर यांनी एक सदनिका खरेदी केली होती. यासाठी त्यांनी त्या बिल्डरला 8 लाख 32 हजार रुपयांची रक्कम देखील दिली होती. मात्र बिल्डरने त्यांच्याकडून पैसे घेऊन ती सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली. त्यामुळे त्यांनी बिल्डरविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला. त्यानंतर त्यांना 6 लाख 25 हजार हजार रुपये मिळाले देखील. त्यानंतर उर्वरित 2 लाख 8 हजाराची रक्कम बिल्डरने नालासोपारा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नरवडे यांच्याकडे सोपवली होती.

त्यानंतर पोलिसांकडे हि रक्कम मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती. त्याचबरोबर पैसे न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला होता. त्यानंतर मंत्रालयातून आदेश आल्यानंतर त्यांना ती रक्कम घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात देखील ती रक्कम देण्यास चालढकल झाल्याने त्यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, स्वतःचे कष्टाचे पैसे देखील वर्षभर न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.

visit : Policenama.com