वलसाडमध्ये प्लायवूड उत्पादक कंपनीत भीषण आग

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात भिलाड जवळील राष्ट्रीय महामार्गावरील तलवाडा गावात प्लायवूड उत्पादक कंपनीला रात्री भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.रात्रीची आग अजूनही सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लाकूड आणि प्लायवूड साहित्यांना आग लागली.

आग लागल्याचे कळताच सरीगम, उमरगाम, वापी, वलसाड येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.  आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कंपनीच्या बाजूला पेट्रोल पंप असल्याने लोकांनी व कर्मचार्‍यांनी भयभीत होऊन पळ काढला. आगीची तीव्रता भीषण असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.  महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उंबरगावजवळील तलवाडातील अहमदाबाद महमार्गानजीक असलेली टायमॅक्स या प्लायवूड बनविणार्‍या कारखान्याला काल रात्री 10 दरम्यान भीषण आग लागली. ही आग लागण्याचे कारण अस्पष्ट असले तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीला आग लागल्यानंतर बाजुलाच असलेल्या पेट्रोल पंपावरील  कामगारांनी भयभीत होऊन पळ काढला. अग्निशमन दलाच्या प्रथम पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि पेट्रोल पम्पाचा धोका टळला.

हा कारखाना प्लायवूड बनविण्याचा होता. त्यामुळे कारखान्यांत मोठ्या प्रमाणात पालवूड आणि लाकूड साठा असल्याने आग वाढली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती असून कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.