दुर्दैवी ! जखमी खेळाडूला ‘ऑपरेशन’ थिएटरमध्ये नेलं, तो पुन्हा ‘शुद्धी’वर आलाच नाही

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – कबड्डी खेळताना हाताला जखम झाल्याने एका खेळाडूला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी खेळाडूला रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर हा खेळाडू शुद्धीवर आलाच नाही आणि त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना पालघरमध्ये घडली आहे. मिलिंद निकोल असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

पालघर मनोर येथील सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे 23 वर्षीय मिलिंदचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. मिलिंद हा शुक्रवारी कबड्डी खेळताना पडल्याने त्याच्या हाताला फॅक्चर झालं होतं. त्यानंतर त्याला मनोरच्या सह्याद्री या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. फॅक्चर झाले असताना डॉक्टरांनी त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र, ऑपरेशन झाल्यानंतर मिलिंद पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. त्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले.
मिलिंदच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मिलिंदला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला असल्याची माहिती मिलिंदवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून देण्यात आली.