पालघरची घटना ‘हिंदू-मुस्लिम’ प्रकरण नाही, अफवा पसरवल्यास कारवाई : CM उद्धव ठाकरे

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील पालघरमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर उद्धव सरकार निशाण्यावर असताना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर सरकारची भूमिका सर्वांसमोर मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे सरकार कोणत्याही दोषीला सोडणार नाही, लोकांनी हा विषय भडकवण्याचा प्रयत्न करू नये. मॉब लिंचिंग घटनेत जमावाने तीन जणांना मारहाण करून हत्या केली.

उद्धव ठाकरे यांनी घटनेविषयी सांगितले की, हे हिंदू-मुस्लिम सारखे प्रकरण नाही. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोललो आहे. प्रत्येकाला हे समजावून सांगण्यात आले आहे की ही धर्माशी संबंधित कोणतीही गोष्ट नाही, परंतु जो कोणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आग लावण्याचा आणि प्रकरण भडकवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल

पालघर मॉब लिंचिंग वर केंद्राने उद्धव सरकारकडे मागितला अहवाल, दोन पोलीस कर्मचारी निलंबित पालघर जवळील गावात ३ जणांना जमावाने मारहाण केली, तिघांवर चोरी केल्याचा संशय होता. यावेळी पोलिसही तेथे उभे होते, पण ते फक्त तमाशा पाहत राहिले. या प्रकरणात राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली असून १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव म्हणाले की, जेव्हा ते लोक सूरतला जात होते तेव्हा त्यांना दादर-नगर हवेलीच्या सीमेवर थांबवले आणि परत पाठवले गेले. तसे झाले नसते तर घटना घडली नसती.

चोरीच्या संशयाने झाली घटना
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघरमधील ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो एक अत्यंत दुर्गम भाग आहे. अशा परिस्थितीत हे तिघेजण गुजरातकडे जात होते, मात्र रात्री गावातील लोकांना काही गैरसमज झाला आणि त्यांना चोरीचा संशय आला. म्हणून त्यांच्यावर हल्ला केला गेला, हे दुर्दैवी आहे.

ते म्हणाले की, काही दिवसांपासून येथे चोरटे फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे, म्हणूनच ग्रामस्थांनी असा हल्ला केला. पण गैरसमज असले तरी कोणालाही वाचवले जाणार नाही, बर्‍याच लोकांना अटक करण्यात आली आहे. लोकांनी पोलिसांवरही हल्ला केला आहे, अशा परिस्थितीत कडक कारवाई केली जाईल.

विशेष म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारकडे यासंदर्भात अहवाल मागवला असून राज्य सरकारकडून त्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, ज्यांच्या पोलिस स्टेशन परिसरात घटना घडली होती. हे प्रकरण १६-१७ एप्रिलच्या रात्री पालघरपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या गडचिंचले गावात घडले आहे.