पालघर घटनेवरून राजकारण पेटलं ! आरोपींच्या यादीत राष्ट्रवादी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं भाजपकडून उघड (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर मध्ये घडलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मात्र ही घटना घडल्यापासून या घटनेवरून राजकारण मात्र चांगलंच पेटलेलं पाहायला मिळत आहे. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधी पक्षाने कोंडीत पकडले आहे. कोणतेही धार्मिक तेढ निर्मण होऊ नये म्हणून बुधवारी या प्रकरणातील आरोपींची नावे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर जाहीर केली. मात्र ‘या व्हिडिओत दिसणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं समोर आणा’ अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

त्या व्हिडिओची वस्तुस्थिती समोर आणावी

याबाबतीत बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत म्हंटले आहे की, “पालघर घटनेतील व्हिडीओमध्ये जे दिसत आहेत त्यांचीही नावे समोर आणा, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे झेडपी सदस्य काशिनाथ चौधरी दिसतात, गुन्हेगारांच्या यादीत सीताराम चौधरी दिसतात, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनील रावते असाले त्याठिकाणी दिसतात ही वस्तूस्थिती समोर आणावी असं त्यांनी सांगितले आहे.

… हा तर सत्तेतील बदल

तसेच भगवी वस्त्र लाल झाली त्याचं राजकारण करु नये अशी टीका केली जाते, भगव्या विचारधारेने सत्तेत बसला मात्र आज भगव्या विचारधारेचं वक्तव्य केल्यावर धार्मिक तेढ निर्माण होते हा सत्तेतील बदल दिसत आहे. रुग्णांची संख्या वाढते, मृतांचा आकडा वाढतो, हॉस्पिटलची दुरावस्था आहे, याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे असा टोला प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला आहे.

काय आहे प्रकरण ?

गुरुवारी पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. यावरुन राज्य सरकारवर विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे. या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये असं राज्य सरकारकडून बजावण्यात आलं आहे. आतापर्यंत १०१ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.