Updated News : पालघर नगरपरिषदेचा अजब निकाल ; सेना-भाजपचे बहुमत तर नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पालघर नगरपरिषदेचा आज निकाल लागला आहे. सेना भाजप युती झाल्यानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत शिवसेना बंडखोर उमेदवारामुळे शिवसेनेला चांगलाच फटका बसला आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उज्वला काळे या नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या आहेत.

पालघर नगरपरिषदेचा अंतिम निकाल काही वेळापूर्वीच हाती आला आहे. पालघर नगरपरिषदेत महायुतीला १९ जागा मिळाल्या असून ५ अपक्षांनी देखील या निवडणुकीत विजय संपादित केला आहे. तर काँग्रेस आघाडीला फक्त दोन जागी विजय मिळाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

पालघर नगरपरिषदेसाठी काल २४ मार्चला मतदान पार पडले आहे. पालघर नगरपरिषदेला ६७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर भाजप शिवसेनेच्या वर्चस्वात असणाऱ्या भागात राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष कशा निवडून आल्या हा सर्वांना प्रश्न पडला आहे. शिवसेनेने श्वेता पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्या नंतर अंजली पाटील या शिवसेना इच्छुक महिलेने शिवसेनेच्या उमेदवाराला आव्हान दिले. अंजली पाटील या अपक्ष उभा राहिल्यानंतर श्वेता पाटील आणि अंजली पाटील यांच्यात मताचे विभाजन झाले परिणामी राष्ट्रवादीच्या उज्वला काळे ह्या विजयी झाल्या आहेत.