पालघर : डहाणू परिसरात दिवसभरात भूकंपाचे 6 सौम्य धक्के

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज (रविवार) सहा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. आज सकाळपासून भूकंपाचे धक्के बसल्याने पुन्हा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी 11 पासून हे भूकंपाचे धक्के बसले आहे. एका पाठोपाठ सहा धक्के बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आज सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी 1.8 तीव्रतेचा, 11 वाजून 39 मिनिटांनी 3.1 तीव्रतेचा, दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी 2.1 तीव्रतेचा, सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी 1.8 तीव्रतेचा, सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी 2.3 तर सायंकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी 3.2 तिव्रतेच्या भूकंपाचे झटके बसले आहेत.

या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू डहाणू तालुक्याच्या परिसरात होते व केंद्रबिंदूची खोली पृष्ठभागापासून दहा किलोमिटर होती. तीन पेक्षा जास्त तीव्रतेचे दोन धक्के बसल्याने डहाणू तालुक्यातील अनेक ठिकाणी कंप झाल्याचे जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर 2018 पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून यामध्ये वाढ होऊन तीव्रता देखील वाढली आहे. या भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.