विरारमध्ये दिवसाढवळ्या कंत्राटदाराच्या छातीवर झाडल्या गोळ्या, प्रचंड खळबळ

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – विरार येथे एका ४२ वर्षीय कंत्राटदारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडण्यात आल्या. मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना पालघरमधील विरारमध्ये घडली.दोन जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी कंत्राटदाराच्या छातीवर गोळ्या झाडल्या. आश्रम राठोड असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. आश्रम राठोड हे बारपेश्वर तलावाजवळ उभे होते. त्याचवेळी दोघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीत लागली आणि त्यात ते जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांना व्हॉट्सॲपवर पिस्तुल आणि बुलेट्सचे फोटो पाठवण्यात आले होते. अनोळख्या नंबरवरून त्यांना हे फोटो पाठवण्यात आले होते. पोलीस त्या दिशेने तपास करत आहे. पूर्ववैमनस्यातून त्यांनी राठोड यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राठोड हे पेशाने कंत्राटदार आहेत तसेच ते एका स्थानिक बांधकाम व्यवसायिकासोबत काम देखील करत होते. ते बारपेश्वर तलावाजवळ राहत होते. राठोड यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.