पालघर : लोकल बंद करण्याच्या निर्णयाने प्रवासी उतरले रेल्वे ट्रॅकवर, राजधानी एक्सप्रेस ठेवली अडवून

पालघर : मुंबईकडे जाणार्‍या सौराष्ट्र एक्सप्रेस वेळ बदलल्याने आणि पालघर स्थानकात येणारी लोकल बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईकडे जाणार्‍या सौराष्ट्र एक्सप्रेस पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी पालघरला येते ती वेळ बदलण्यात आली असून ती पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी केली आहे. तसेच पालघर स्थानकात येणारी ५ वाजून १५ मिनिटांची लोकल उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. त्याचवेळी ४ वाजून ४० मिनिटांची लोकल रद्द केली. ही माहिती पहाटे मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना मिळाली. मुंबईकडे पहाटेच रवाना होणार्‍या प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होणार आहे. त्याचवेळी पालघर रेल्वे स्थानकातून सोडण्यात आलेली लोकल केळवे स्थानकात सायडिंगला काढण्यात आली व मुंबईकडे जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसला पुढे सोडण्यात आले. यामुळे संतप्त झालेले प्रवासी पालघर आणि सफाळे या दोन्ही रेल्वे स्थानकावरील ट्रॅकवर उतरले. त्यांनी राजधानी एक्सप्रेस अडवून ठेवल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद पडली. संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद पडल्याने रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी दोन्ही स्थानकात धाव घेतली. पालघर रेल्वे स्टेशन मास्तरांना प्रवाशांच्या मागण्याचे निवेदन दिले आहेत. हे निवेदन मुंबई सेंट्रलला पाठविण्याचे व तेथे जाऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्याचवेळी सफाले येथील स्टेशन मास्तरांना प्रवाशांनी घेराव घातला व आपल्या मागण्याचे निवेदन दिले आहे. स्टेशन मास्तरांच्या आश्वासनानंतर प्रवाशांनी राजधानी एक्सप्रेसला पुढे जाण्यास परवानगी दिली.

You might also like