Coronavirus : राज्यातील 12 वा बळी, पालघरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’ मुळे मृत्यु

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन  – पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथील एका ५० वर्षाच्या नागरिकांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यु झाला. या नागरिकाला गेल्या ३ दिवसांपासून पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे राज्यातील मृतांची संख्या आता 12 झाली आहे. ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये हा नागरिक काम करत होता.

गेल्या काही दिवसांपासून उसरणी व सफाळे येथे राहायला आला होता. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यावर त्याला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या चाचणीचा अहवाल प्रतिक्षेत होता. त्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

त्याची प्रकृती सकाळपासूनच गंभीर झाली होती. त्यांचे निधन झाले. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नागरिकांने प्रवासादरम्यान तसेच गावातील वास्तव्यादरम्यान अनेकांशी संपर्कात आला असल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.