पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास पुन्हा मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमचे पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत उद्या म्हणजेच 31 डिसेंबर 2019 रोजी संपत होती.

आयकर कायदा 1961 मधील तरतूद 139AA नुसार, तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. यासाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. ही मुदत केंद्र सरकारने आठव्यांदा वाढवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की आधार हे आता आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी बंधनकारक असेल. 1 जुलै 2017 पासून पॅन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड मिळण्याचा अधिकार आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया कडून भारतातल्या नागरिकाला मिळते, तर पॅन हा दहा अंकी क्रमांक आयकर विभाग देते. हा क्रमांक एखाद्या व्यक्तीचा किंवा कंपनीचा असू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/