पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या जागेवर भाजपकडून कुंकळ्येकर यांना उमेदवारी

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या यांच्या निधनानंतर रिक्‍त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराची घोषणा आज करण्यात आली आहे. भाजपकडून माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजप उमेदवारी देईल अशी चर्चा चालु होती. मात्र, आता त्या सर्व चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

प्रदेश भाजपने पणजी विधानसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी पणजी मनपामधील भाजप नगरसेवक आणि पणजी भाजप मंडळ पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे मत लक्षात घेतले. त्यानंतर निवडणूक समितीने कुंकळ्येकर आणि उत्पल पर्रिकर यांची नावे केंद्रीय समितीला कळविली होती. वाराणसी येथील कार्याक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी हे व्यस्त असल्याने पणजी विधानसभेच्या उमेदवाराची निवड काहीशी लांबली होती.

अखेर आज (रविवारी) दुपारी सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्या नाव जाहिर करण्यात आले. कुंकळ्येकर हे यापुर्वी पणजी येथुन दोन वेळा निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या (दि.29) दुपारी 3 वाजता संपत असल्याने सिध्दार्थ कुंकळ्येकर हे उद्या त्यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.