Coronavirus Impact : ‘या’ राज्यात एक वर्षासाठी नवीन नोकर भरतीला स्थगिती, कर्मचार्‍यांची LTC देखील बंद, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणामध्ये नवीन कर्मचार्‍यांच्या भरतीवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. याबरोबरच हरियाणा सरकारने राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना एलटीसी सुविधा देखील बंद केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा करत म्हंटले की, कोरोनामुळे प्रचंड आर्थिक संकट ओढवले आहे, यासाठी सरकार खर्च कमी करीत आहे. त्यामुळे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. यादरम्यान, कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावरही एका वर्षासाठी बंदी घातली आहे. याबरोबरच हरियाणा सरकारने येत्या काही दिवसांत राज्यातील परिवहन सेवाही सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी ही माहिती दिली. दुष्यंत चौटाला म्हणाले की, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये हरियाणा सरकारने घेतलेल्या सर्व चरणांची माहिती दिली आहे. हरियाणामधील रेड झोन जिल्ह्यात लॉकडाऊन सुरूच राहील, याशिवाय राज्यातील कंटेनमेंट झोनबाहेरील भागातील उपक्रम सुरू करण्यासाठी विचार केला जाऊ शकतो. तेथील आर्थिक क्रियाकलापांना गती कशी द्यायची याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे. दुष्यंत चौटाला म्हणाले की, हरियाणामध्ये अनेक उद्योग चालवले गेले आहेत. या उद्योगांमध्ये सुमारे 73 लाख कर्मचारी कामावर परतले आहेत.

‘लवकरच जिल्ह्यात परिवहन व्यवस्था सुरू केली जाऊ शकते’- दुष्यंत चौटाला
दुष्यंत चौटाला म्हणाले की, लवकरच हरियाणामधील जिल्ह्यात परिवहन व्यवस्था सुरू करण्याची शक्यता आहे. आम्ही अधिकाऱ्यांना यासाठी योजना करण्यास सांगितले आहे. तसेच आज प्रत्येक राज्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आज पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर पुढील 4-5 दिवसांत केंद्र सरकार हरियाणामधील उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक पॅकेज देईल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.