राजस्थान : रामकथा सुरू असताना मंडप कोसळला ; १४ भाविकांचा मृत्यू, २४ गंभीर

बाडमेर : राजस्थानच्या बाडमेर येथे रविवारी २३ जून रोजी जोरदार पाऊस आणि वादळामुळे खूप लोकांचा जीव गेला आहे. बाडमेर जिल्ह्याच्या एका गावात धार्मिक कार्यक्रम सुरु होता आणि त्याच वेळी अचानक वादळ आल्यामुळे मंडप पडला. या घटनेत कमीतकमी १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. २४ लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांना जवळच्या नाहटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वादळ इतके वेगवान होते की लोकांना सावध होण्याची संधी देखील मिळाली नाही.

बरेच लोक जखमी
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बालोतरा येथे एका वस्तीवर रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा ऐकण्यासाठी महिला आणि पुरुष भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमारास आलेले वादळी वारे आणि पावसापुढे हा मंडप तग धरू शकला नाही आणि हा मंडप भाविकांवर कोसळला. या दुर्घटनेत १४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २४ गंभीर जखमी झाले आहेत.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली.


मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनीही व्यक्त केले दुःख
या घटनेविषयी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्देवी असून जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.