पंढरपूरमधील पोटनिवडणुकीत कुणाला मिळणार उमेदवारी ? अजित पवारांनी केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांचे महिनाभरापूर्वी निधन झालं. दरम्यान, रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये कोणाला संधी मिळणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेबाबत आता स्वत: अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

‘पार्थ पवार यांना उमेदवारीबाबत देण्यात येत असलेले वृत्त पूर्णपणे निराधार आहे. तसंच त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले, की भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. असं ही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.