Ajit Pawar : ‘पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला जाईल’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पक्षाच्या बैठकीसाठी पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला जाईल. उमेदवाराची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करतील, असे सांगत भगीरथ भालके हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी त्यावेळी दिले आहे.

दरम्यान, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाची रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होत. त्यावेळी बैठकी दरम्यान, अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उठले असता, कार्यकर्त्यांनी भगीरथ भालके यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी ते पवार म्हणाले, शांत राहा, तुमच्या मनातीलच उमेदवार पक्षाकडून दिला जाईल. पक्षाने दिलेल्या उमेदवारास निवडून देण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटना यांनी उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याची कामगिरी केली पाहिजे. असे ते म्हणाले. .

त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेतल्यानंतर तुम्ही जो विचार करताय तोच उमेदवार देण्यात यावा, असा निरोप पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवण्यात येणार आहे. तेच उमेदवार जाहीर करतील. परंतु, पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे, दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, ‘विठ्ठल’चे चेअरमन भगीरथ भालके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.