चार खासदारांच्या जीवावर शरद पवार दिल्लीत सौदेबाजी करतात : चंद्रकांत पाटील

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करत आहेत. या चार जागा भाजपने जिंकल्यावर शरद पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावे लागेल, असा घणाघात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगोला येथे केला.

सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटील यांचेसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

शरद पवार यांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघामध्ये आहे. यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच बारामती धोक्यात असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शरद पवार या चार मतदारसंघाच्या जीवावर दिल्लीत राजकारण करतात. मात्र, या चार जागा भाजपने जिंकल्यावर त्यांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.