पंढरपूर : Pandharpur Crime News | आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो वारकरी एकत्र येत असतात. वारीच्या पार्श्वभूमीवर १० मिनिटात ५०० ते ६०० लिटर भेसळयुक्त दुध बनवुन वितरित करणार्या जनावरांच्या डॉक्टरवर जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी एमपीडीए (MPDA Act) अन्वये कारवाई करुन या डॉक्टरला येरवडा कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
डॉ. दत्तात्रय महादेव जाधव Dr. Dattatreya Mahadeva Jadhav (वय ४५, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) असे या भेसळयुक्त दुध बनविणार्याचे नाव आहे
दत्तात्रय जाधव हा व्यवसायाने गुरांचा डॉक्टर आहे. त्याच्याकडे कोणतेही गायी म्हशी अशी जनावरे नसताना त्याने मानवी आरोग्यास हानिकारक असे भेसळयुक्त पदार्थ वापरुन त्याच्या अॅरो प्लॉटमधील पाणी गरम करुन त्यात मिल्क पावडर, प्रतिबंधित नंदिनी होल मिल्क पावडर, व्हे प्रोटीन, पाम तेल, कार्बो नावाचा रासायनिक पदार्थ व सोडिअर लॉरेल सल्फेट एकत्र करुन रासायनिक प्रक्रिया करुन कृत्रिमरित्या ५ ते १० मिनिटात ५८० लिटर भेसळयुक्त दुध करत. तो अनिकेत कोरके याच्या मालकिच्या अनिकेत दुध संकलन केंद्र या दुध संकलन केंद्रात हे दुध देत.
त्यांच्याकडे दुध संकलनाचा परवाना नसताना भेसळयुक्त दुध संकलन व कुलिंग करुन २०२४ ते २०२५ पर्यंत नेचर डिलाईट डेअरी (कळस, ता. इंदापूर) यांना मोठ्या प्रमाणावर दुध पाठवत होता. इतर ग्राहकांना देखील विक्री करत होता. याप्रकरणात दत्तात्रय व सोनाली जाधव यांच्या राहत्या घराजवळच्या गोडावून मधून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुध बनविण्याचे साहित्य, मिल्क पावडर, अज्ञात रसायने असा साठा व इतर साधन सामुग्री सहायक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला.
दत्तात्रय जाधव याने जामिनासाठी अर्ज पंढरपूर सत्र न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर (Add PP Kiran Bendbhar) यांनी सांगितले की, आरोपी दत्तात्रय जाधव हा मुख्य आरोपी असून त्याने गंभीर गुन्हा केला आहे. हा गुन्हा समाजातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. या गुन्ह्यात अन्न विश्लेषक यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे भेसळयुक्त दुध बनविण्याचे पदार्थ हे असुरक्षित असल्याचा अहवाल आला. तसेच पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचाही अहवाल प्राप्त झाला असून हे भेसळयुक्त दुध मानवी शरीरास अपायकारक असून त्यामुळे त्याचे सेवन केल्यास फुफ्फुसाचे आजार, श्वसन नलिकेचे आजार, कॅन्सर असे आजार होऊ शकतात. हे भेसळयुक्त दुध विषारी असल्याने मानवी जिविताचा मृत्युही होऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. आरोपी दत्तात्रय जाधव याने अशा भेसळयुक्त दुधातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवला आहे. त्याच्यावर यापूर्वी करकंब पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहे.
आरोपी अनिकेत कोकरे याच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा समाज जीवनाशी संबंधित असून त्याला जामिनावर सोडल्यास तो पुन्हा भेसळयुक्त दुध बनवुन वितरित व विक्री करुन मानवी जिवितास हानी पोहचवतील. या गुन्ह्यात आतापर्यंत १० आरोपींना अटक झाली असून सर्व आरोपी यांचे आपसात व बँकेतून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे व ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्यांना जामीनावर सोडल्यास ते फरार होतील. साक्षीदारांवर दबाव आणतील, म्हणून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, असा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी केला. तो ग्राह्य मानुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस बी देसाई यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी दत्तात्रय जाधव याच्यावर एमपीडीए अन्वये कारवाई करत एक वर्षे स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.