धोंडोपंत महाराज शिरवळकर यांचे निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा

पोलिसनामा ऑनलाईन – शिरवळकर फडाचे मालक ह.भ.प.धोंडोपंत (दादा) महाराज शिरवळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा भजनाची सेवा व परंपरागत वारकरी भजन यासाठी दादामहाराज हे संप्रदायातील लहानाथोरांना परिचीत होते. गेल्या काही दिवसांपासून किडणीच्या आजाराने ग्रस्त झाले असतानाही हातात काठीचा आधार घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी आपली भजनाची व किर्तनाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडली होती.

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य मानकरी, पालखी सोहळा उपाध्यक्ष, पालखी सोहळ्यात रथापुढे 13 दिंडी शिरवळकर फडाची परंपरा आहे. आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरात मुख्य पहारेकरी म्हणूनही शिरवळकर फडाची परंपरा आहे. ह.भ.प.धोडोंपत(दादा) महाराज शिरवळकर यांचे अंत्यसंस्कार परंपरेप्रमाणे विष्णुपद येथे करण्यात आले. शिरवळकर फडाची तुकोबांवर व गाथेवर प्रगाढ श्रद्धा होती. पूर्वी पंढरपूर येथील तुकाराम मंदिराचे बांधकाम होण्याआधी तुकोबांची पालखी पंढरपुरात शिरवळकर वाड्यात उतरत होती. देहू येथील बीजेच्या उत्सवामध्ये विठोबा रखुमाई मंदिरातील मुख्य मंडपातील सर्व कार्यक्रम शिरवळकर फडाचे असतात. या कार्यक्रमात दादा महाराजांची व त्यांचे वडील वै. तुकाराम बुवा यांची कीर्तन या मंडपात ऐकली आहेत.