Pandharpur Election Results 2021 : भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, नेटकऱ्यांकडून फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Advt.

पंढरपूर : ऑनलाइन टीम –   पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा पराभव केला. भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांचा पराभव केला. अवताडे यांनी भालके यांचा 3 हजार 503 मतांनी पराभव केला. समाधान अवताडे यांचा विजय झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल केल्याचे सांगितले जात आहे.

समाधान अवताडे यांच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. पंढरपुरमध्ये झालेल्या फडणवीस यांच्या सभेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करुन दाखवतो असे विधान केले होते. हाच व्हिडीओ अवताडे यांच्या विजयानंतर प्रचंड व्हायरल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?

लोक विचारतात केवळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे. याने काय सरकार बदलेल का ? असे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा ते बदलू आपण. लोकशाहीत या सरकारचा अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार सुरु आहे. म्हणून या सरकारला जागा दाखवून देण्यासाठी पहिली संधी कुणाला मिळाली असेल तर ती मंगळवेढा-पंढरपूरच्या नागरिकांना मिळाली आहे. म्हणून या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. पंढरपूरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून देऊन तुम्ही त्यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो, असे फडणवीस यांनी म्हटले होते.