राष्ट्रवादी काँग्रेसचा खुलासा, म्हणाले – अँड. नितीन मानेंचा ‘राष्ट्रवादी’शी काहीही संबध नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. दरम्यान राष्ट्रवादीच्या लीगल सेलने ही पोटनिवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावर आता राष्ट्रवादीने खुलासा केला आहे. पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारे अँड. नितीन माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलशी काहीही संबंध नसल्याचे राष्ट्रवादीचे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की, अँड नितीन माने या नावाचा व्यक्ती स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचा प्रदेश कार्यकारणी सदस्य असल्याचे भाासवत असून त्याचे लेटर हेड देखील बनविले आहे. त्या लेटरहेडचा वापर करून राष्ट्रवादीच्या लीगल सेलच्या नावाचा गैरवापर करून विविध निवेदन आणि तक्रारी देत आहे. त्याचा लीगल सेलशी काहीही संबध नाही. तसेच नितीन माने यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. त्याने दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी राष्ट्रवादी लीगल सेलचा काहीही संबंध नाही. लीगल सेलचा पदाधिकारी या नात्याने त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, पत्रव्यवहार करू नये असा खुलासा राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अँड आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घ्यावी ही राष्ट्रवादीची मागणी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.