पंढरपूर पोटनिवडणूक : ट्रेंड बदलला ! भाजपच्या समाधान आवताडेंनी घेतली मोठी आघाडी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला पोस्टल मतदानाने सुरुवात झाली. सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान आवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे. त्यामुळे या मतदार संघातील ट्रेंड बदलणार असे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात आहेत. ही जागा राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह बहुतांश मंत्र्यापासून प्रवक्ते अमोल मेटकरी यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी गाजवली. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाळा भेगडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरले होते. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला पोस्टल मतांची मोजणीने सकाळी आठ वाजता सुरुवात करण्यात आली. पहिल्या फेरीत भगीरथ भालकेंनी आघाडी घेतली. भगीरथ भालके यांना २३१० मते, समाधान आवताडे यांना १३७२ मते, तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ३० मते पडली आहेत. त्यानंतर, पाचव्या फेरीअखरे भगीरथ भालके ६५८ मतांनी आघाडीवर होते. मात्र त्यानंतर भालकेंची पिछेहाट झाली असून आठव्या फेरीअखेर आवडतेंनी २२०० मतांची आघाडी घेतली आहे. आता नवव्या आणि दहाव्या फेरीतही आवताडेंनी आघाडी कायम राखली होती.

आवताडे यांना नवव्या फेरीअखेर २३५७ मतांची आघाडी मिळाली होती. तर, दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर १८३८ मताची आघाडी मिळाली आहे. या पोटनिवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना ज्या भागात मताधिक्याची अपेक्षा होती त्या भागातच समाधान आवताडे यांनी चांगली लीड घेतली आहे. आवताडे यांना अकराव्या फेरीअखेर १५०३, बाराव्या फेरीअखेर १४०९ तर १५ व्या फेरीअखेर३८०० मतांनी आघाडीवर आहेत.