भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,733 मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे. दरम्यान निवडणुकीतील पराभवानंतर भालके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभूत झालो तरी संपलो नाही, जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास भालके यांनी व्यक्त केला आहे.

भगिरथ भालके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले की, निवडणुकीत निसटत्या मताने पराभव झाला तरी मी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. माझे वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर ते लगेच दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिल्याचे भालके यांनी सांगितले आहे. दरम्यान समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे 5 वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर- मंगळवेढा हा मतदार संघ काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपा-सेनेची युती असल्यापासून येथे त्यांचा उमेदवार कधीही निवडून आला नाही. पण यावेळी मात्र प्रथमच या मतदारसंघात कमळ फुलले आहे. आवताडेंना 1 लाख 9 हजार 450 मते मिळाली, तर भालकेंना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. सिद्धेश्वर आवताडे हे 2,955 मते घेऊन तिस-या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या 1 हजार 607 मते घेत चौथ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत निवडणुकीपूर्वी पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालकेंचा कमी जनसंपर्क, कर्जमाफी, अनुदान हे भालकेंच्या पराभवाची कारणे सांगितली जात आहेत.