पंढरपूर पोटनिवडणूक ! भारत भालकेंची जागा कोण घेणार? ‘ही’ नावे सध्या चर्चेत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र, भालके यांची जागा कोण घेणार याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यामध्ये दोन नावांची चर्चा आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, ही पहिलीच पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या एकमताचा उमेदवाराशी लढत भाजपला द्यावी लागणार आहे. त्यामुळे हे भाजपसाठी एक मोठे आव्हान आहे. सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे इच्छुकांची गर्दी होत आहे. भारत भालके यांच्यानंतर सक्षम उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी आहे. त्यामध्ये सध्या भालके यांची पत्नी जयश्रीताई भालके किंवा त्यांचे पुत्र भगीरथ भालके हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तर मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत तब्बल 55 हजार मते घेणारे समाधान अवताडे यांचाही विचार राष्ट्रवादीकडून केला जाऊ शकतो.

तसेच भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक हे काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील एका कार्यक्रमात शरद पवार यांच्यासोबत दिसले होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे. याशिवाय पंढरपुरातील उद्योगपती अभिजित पाटील यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत.