कौतुकास्पद ! PSI ने लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री निधीला केली 1 लाखाची मदत

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस तैनात राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. हे कर्तव्य पार पाडत असताना पोलीस सामाजिक बांधिलकी देखील विसरलेले नाहीत. कोरोना विषाणूच्या लढाईत खारीचा वाठा म्हणून करमाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने यांनी लग्नाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखांचा धनादेश दिला आहे. त्याच्या या अनोख्या कर्तव्य निष्ठेची सर्वत्र चर्चा होत आहे.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. तर अनेकांनी याला एक संधी समजून सकारात्मक दृष्टीकोन बाळगत त्या संधीला अविस्मरणीय केले आहे.. खास करून या काळात लग्न बंधनात अडकलेल्या नवदाम्यपत्यासाठी त्यांचा विवाह सोहळा आजन्म अविस्मरणीय राहणार आहे.

कोरोना कालावधीत महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कर्तव्यासोबतच करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रविण धर्माजी साने यांनी माणुसकीचे दर्शन घडवले असून त्यांनी आपले लग्न साध्यापणाने करून लग्नाचा अनावश्यक खर्चाची 1 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिली आहे. प्रवीण साने यांनी करमाळा येथे 45 दिवस कोरोनाच्या दरम्यान सेवा बजावल्यानंतर विवाह केला आहे.

टाळगाव चिखली तालुका हवेली येथील धर्माजी साने यांचे सुपुत्र असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रविण यांचा विवाह जुन्नर तालुक्यातील आर्वी येथील विलास गाढवे यांची सुकन्या स्नेहल (एम.ई. कॉम्प्युटर) या दोन उच्चशिक्षितांचा विवाह 27 मे रोजी पिंपरी चिंचवडमध्ये होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे व असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन्ही कडील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आर्वी येथे पार पडला. सामाजिक अंतर ठेवत वधू-वरासह सर्वांनी तोंडाला मास्क बांधून हा विवाह सोहळा पार पाडला.
लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून प्रवीण साने यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते. त्यामध्ये दोन्ही कुटुंबाने खूप स्वप्न पाहिली होती.

मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याची स्वप्न पूर्ण होऊ शकली नाही. नवदांपत्यांनी एकमेकांना मास्क आणि सॅनिटायझर भेट देत आयुष्याची गाठ बांधली. ही परिस्थिती आयुष्यभर स्मरणात राहील असं मत नवदाम्पत्य प्रविण आणि स्नेहल यांनी व्यक्त केलं आहे.