पंढरपुरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वंचितकडून आंदोलनाचा इशारा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूरात मंदिर प्रवेश आंदोलन केल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनाचा इशार दिला आहे. प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी गुन्हा मागे घ्या अथवा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरं उघडण्यात यावी या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी पंढपुरात जाऊन आंदोलन केलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत वारकरी संप्रदायातील काही लोक आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिर उघडल्याशिवाय पंढरपूर सोडणार नाही अशी भूमिका बाळासाहेबर आंबेडकर यांनी घेतली होती. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह काही लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.

येत्या 8-10 दिवसात राज्यातील सर्व मंदिरांबाबत नियमावली तयार करून मंदिरं उघडली जातील असं आश्वासन प्रशासनाच्या वतीनं मिळालं आहे असंही त्यांनी सांगितलं होतं. परंतु 10 दिवसांनंतर जर आदेश आला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रकाश आंबेडकरांकडून देण्यात आला होता.

पंढरपूर परिसरात मोठी गर्दी झाली होती. प्रकाश आंबेडकर, वारकरी संप्रदायातील काही लोक आणि वंचित बहुजन आघाडीतील 1200 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापनानं खास पत्रक काढून माहिती दिली होती की, येत्या 30 सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे.