पोलिसांच्या छाप्यामुळं सोलापूर जिल्ह्यात खासगी सावकारांमध्ये खळबळ ; स्टॅम्प, अन् कोरे चेक जप्त

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी सावकारांकडून त्रास होत असल्याची तक्रार दोन शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे केली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल सहाय्यक निबंधक कार्यालयाने तात्काळ घेतली असून अधिकाऱ्यांनी खासगी सावकारांच्या घरावर शुक्रवारी अचानक धाडी टाकल्या. यामध्ये खासगी सावकारांच्या घराची झडती घेण्यात आली त्यावेळी स्टॅम्प, कोरे चेक आणि इतर कागदपत्रे मिळून आली.

खासगी सावकाराच्या घरामध्ये स्टॅम्प, कोरे चेक सापडल्याने खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध खासगी सावकारकी करण्याऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. टाकळी येथील दिनकर शिंदे (रा. महात्मा फुले नगर) हे खासगी सावकारकी करत होते. त्यांनी अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना व्याजाने पैसे दिले आहेत. रक्कम देताना ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून कोरे चेक, स्टॅम्प आणि कागदपत्रे घेत होते.

शेतकरी आणि व्यावसायिकांनी व्याजाने घेतलेल्या पैशांची व्याजासहीत परतफेड केल्यानंतर देखील शिंदे हे आणखी रक्कम उकळत होता. पैशांसाठी तो दमदाटी करून व्यापाऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून घेतलेले कोरे चेक न्यायालयात दाखल करून रक्कम वसूल करत होता. शिंदे याने अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देऊन त्यांची आर्थिक लुबाडणूक केली आहे.

तालुक्यातील सोनके येथील शेतकरी नेताजी खरात यांनी 60 हजार तर बाळासाहेब सप्ताळ यांनी 1 लाख रुपये शिंदेकडून घेतले होते. पैशांची परतफेड केल्यानंतरही शिंदे याने आणखी पैसे पाहिजेत असे सांगून दमदाटी केली. तसेच न्यायालयात चेक सादर केले. या दोघांनी उसने पैसे घेतल्याचे त्याने न्यायालयात खोटे सांगितले. या दोघांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे शिंदे विरोधात तक्रार केली. सहाय्यक निबंधक एस.एम. तांदळे यांनी पथकासह शिंदे याच्या घरावर छापा मारला. यावेळी अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून घेतलेल स्टॅम्प, कोरे चेक, कागदपत्र आढळून आली. याप्रकरणी शिंदे याची कसून चौकशी सुरु आहे.