दुर्देवी ! पिकअपच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू, ‘ते’ स्वप्न अधूरच राहिलं

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने गोपाळपूर येथील दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सैन्यात जाण्यासाठी हे दोन भाऊ पहाटेच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. त्यावेळी हा अपघात झाला आणि त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज (शनिवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. या अपघातामुळे दोन भावांचे सैन्यात जाण्याच स्वप्न अपूर्ण राहिलं.

गोपाळपूर येथील बाळासाहेब निर्मळे गुरव यांना विजय (वय-19) आणि दयानंद (वय-16) ही दोन मुले होती मोठा मुलगा विजय सैन्यात भरती होण्यासाठी त्याचा मामा नागनाथ गुरव (रा. जावळा) यांच्याकडे भोकसेवाडी (ता. सांगोला) येथे राहून अभ्यास करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो गावी गोपाळपूर येथे राहण्यास आला होता.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास विजय आणि त्याचा लहान भाऊ दयानंद हे दोघे मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी निघाले होते. त्यावेळी एका पिकअप गाडीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले. मात्र दोघांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विजय आणि दयानंद यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून वडील गेल्या काही महिन्यापासून आजारी आहेत.

विजय गुरव हा सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करत होता. तो तयारीसाठी मामा नागनाथ गुरव यांच्याकडे भोकसेवाडी येथे राहून अभ्यास करत होता. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने तो आपल्या गावी गोपाळपूर येथे आला होता. या घटनेमुळे गोपाळपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस पिकअप चालकाचा शोध घेत आहे.