राज्यात खळबळ ! बाईकवरील मारेकर्‍यांकडून भरदिवसा चौकात गोळ्या झाडून राजकीय व्यक्तीचा खून

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यावर गोळी झाडून खून केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विश्वास उर्फ बापू भागवत (वय-40) असे खून करण्यात आलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. ही घटना पंढरपूर-सातारा रोडवर आज दुपारी एकच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे.

पंढरपूर-सातारा रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर विश्वास भागवत हे मित्रांसोबत एका दुकानाच्या समोर गप्पा मारत उभे होते. तेव्हा त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी भागवत यांच्यावर गोळीबार केला. पहीली गोळी भागवत यांना लागली नाही पण दुसरी गोळी त्यांना लागल्याने यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

भागवत यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. जमिनीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका तरुण शेतकरी वर्गातील विश्वास भागवत यांनी काही वर्षापूर्वी शेतीतून व व्यवसायातून प्रगती केली होती. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. दिवसा ढवळ्या आणि भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –