TV पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी अहवाल सादर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूबाबतचा अहवाल ससून रुग्णालयानं पुणे महापालिकेकडे सादर केला आहे. जम्बो रुग्णालयात रायकर यांच्यावर उपचार सुरू असताना काही कमतरता होत्या का याची चौकशी करून हा अहवाल ससूननं सादर केला आहे.

पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाल्यानं जम्बो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कार्डियक ॲम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळं आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. यानंतर श्रमिक पत्रकार संघानं या प्रकऱणी तात्काळ चौकशी करून रायकर यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत याची चौकशी करून विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सूचनांनुसार, रायकर यांच्या उपचारादम्यान प्रोटोकॉलमध्ये काही कमतरता होत्या का याची चौकशी करण्याची विनंती महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र हंकारे यांनी ससूनच्या अधिष्ठातांना केली होती. त्यानुसार ससूननं महापालिकेकडे चौकशी अहवाल सादर केला आहे.