शिर्डीत जवानाच्या गोळीबाराने खळबळ

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – साई मंदिर हा अतिशय संवेदनशील भाग आहे. त्यामुळे या भागात एखादी घटना घडली तर त्याचे पडसाद सर्वत्र उमटण्याची शक्यता असते. अशावेळी साई मंदिराच्या लगत व पालखी रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त जवानाने गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुष्कराज रामप्रसाद सिंग (वय ३८) या जवानाचे नाव आहे. हा जवान मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यामधील हटवा तालुक्यातील शिरमोर येथील राहणारा आहे.

तो आपल्या काही मित्र व भावासोबत मध्यरात्री शिर्डीला आला होता. त्यांनी पालखी रोड येथे हॉटेल कौशल्या येथे रूम घेतली, यावेळी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याने आपल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. मध्यरात्रीच्या शांत वातावरणात अचानक झालेल्या या गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा हा जवान मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना पहायला मिळाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी औताडे यांनी फिर्याद दिली असून पुष्कराज सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जवानाकडे बंदुकीचा परवाना आहे.

हा जवान मद्यधुंद असल्याचेही दिसून आले. हा प्रकार वादातून झाला की आनंदातून हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खरात अधिक तपास करत आहेत.