राज्यसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसमध्ये गोंधळ तर भाजप हळूहळू वाढवतंय ‘ताकद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  राज्यसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे. गुजरात कॉंग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज आणखी दोन कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला आहे. असे सांगितले जात आहे की, करजन विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जीतू भाई चौधरी यांनी स्वेच्छेने आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले की, दोन्ही आमदारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

अशा प्रकारे कॉंग्रेस आमदारांच्या राजीनाम्याचा फायदा आता भाजपाला होत असल्याचे दिसून येत आहे. गुजरात विधानसभेत भाजपकडे १०३ आमदार आहेत, तर त्याला राष्ट्रवादीच्या एका आणि बीटीपीच्या दोन आमदारांचा पाठिंबा आहे. एकूण १०६ आमदार भाजपाकडे आहेत.

तसेच कॉंग्रेसकडे ७३ आमदार होते, त्यापैकी ७ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या दृष्टीने आता कॉंग्रेसकडे केवळ ६६ आमदार आहेत. त्याशिवाय अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी आहेत.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी ३८ मतांची आवश्यकता आहे. अशात आता दोन जागा थेट भाजपच्या खात्यात जात असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसला दोन जागा जिंकण्यासाठी ७६ मतांची आवश्यकता आहे, जे त्यांच्यासाठी सध्या गणिताच्या हिशोबाने मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर या संधीचा पुरेपूर फायदा भाजपला घ्यायचा आहे आणि कॉंग्रेसचे माजी नेते नरहरी अमीन यांना तिसरा उमेदवार म्हणून उभे केले आहे. याशिवाय भाजपने अभय भारद्वाज आणि रामिवा बेन बारा यांना निवडणुकीत उतरवले आहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार शक्ती सिंह गोहिल आणि भरत सिंह सोलंकी हे आहेत.