संतापजनक ! हॉस्पीटलच्या ICU मध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पोलिसनामा ऑनलाईन – एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना हरयाणातील पानिपत येथे घडली. तरुणी मॉडेल टाऊनमधील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत उपचार घेत होती. तिच्यावर दोन कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारीला त्यांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिला जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. २६ जानेवारीला रात्री रुग्णालयातील एक कर्मचारी सुट्टी झाल्यानंतरही घरी गेला नाही. तो आयसीयूतच थांबला. रात्री उशिरा त्याने आयसीयूतील बेडच्या चारही बाजूला पडदे लावून घेतले. त्यानंतर काही वेळाने दुसरा कर्मचारी देखील तिथे गेला. दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक आरोपी बेडभोवती पडदा लावत असून, तो जवळपास एक तास तरुणीसोबत असल्याचे दिसते. त्यानंतर काही वेळाने दुसरा आरोपीही तिथे गेला. तो देखील जवळपास एक तास मुलीसोबत होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.