‘या’ ऐतिहासिक शहरात अवघ्या तासाभरात आढळले 5 बेवारस मृतदेह, ‘कोरोना’ टेस्ट होणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  देशभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे. अशातच हरियानातील ऐतिहासिक शहर असलेले पानीपत शनिवारी हादरुन गेले आहे. पानीपतमध्ये तासाभरातच 5 बेवारस मृतदेह सापडले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्या सर्व मृतदेहांची आता कोरोना चाचणी होणार आहे.

स्थानिक लोकांनी त्यांच्या भागात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. ठराविक अंतराने अशाच प्रकारची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानंतर पोलिस स्थानिक सामाजिक संघटनांच्या मदतीने त्या सर्व मृतदेहांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले असून त्यांची आता कोरोना चाचणी होणार आहे. या मृत्यूचे नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

यातले बहुसंख्य जण हे बेघर असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक प्रशासन चिंतेत असून कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठोस सांगता येणार नाही असे प्रशासनाने म्हटले आहे. शहरात संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याने या घटनेने जास्तच चिंता निर्माण झाली आहे.