‘कोरोना’नं संपवला नात्यातील दुरावा अन् धनंजय मुंडेंना आला ‘खास’ फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना कोरोना झाल्यानंतर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी अहवाल सुरुवातीला निगेटिव्ह आला त्यानंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्याचे समजताच भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी फोन करून प्रकृतीबाबत विचारपूस केली.

पंकजा मुंडे यांनी फोन करून स्वत:ची काळजी घे कुटुंबाची काळजी घे आई आणि मुली लहान आहेत. कोरोनामधून लवकर बरा हो, असं पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात पहिल्यांदाच संभाषण झालं. कोरोनाच्या निमित्ताने राजकारणापलिकडेही नाती महत्त्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय या बहीण-भावातील संघर्ष सातत्याने पहायला मिळाला. सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघर्षाने अगदी टोक गाठले होते. प्रचारादरम्यान अत्यंत खालची पातळी गाठली गेली होती. परळीच्या लढाईत धनंजय मुंडे यांनी बाजी मारत पंकजा यांचा पराभव केला. या सगळ्या संघर्षातून आलेली कटुता धनंजय यांच्या आजारपणाने दूर सारली गेली आहे. धनंजय यांच्या काळजीपोटी पंकजा यांनी धनंजय यांना कोरोना झाल्याचे समजताच लगेच त्यांच्याशी संपर्क साधला.

राजेश टोपेंनी दिली माहिती
धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं असून तयारी पूर्ण झाली आहे. ते फायटर असून 8 ते 10 दिवसांत ते पुन्हा एकदा सक्रीय होतील असे राजेश टोपे यांनी सांगितले.