भाजपाच्या विभागीय बैठकीला पंकजा मुंडे ‘गैरहजर’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपची विभागीय आढावा संघटनात्मक बैठक आज औरंगाबदमध्ये सुरु आहे. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे गैरहजर आहेत. पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी या बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपची विभागीय बैठकीत संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मराठवाड्याच्या जिल्हास्तरीय आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत मराठवाड्याच्या जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात मागील निवडणुकीमध्ये झालेल्या जय-पराजया विषयी तक्रारी बद्दल चिंतन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत. मात्र पंकजा मुंडे मराठवाड्याच्या नेत्या असूनही त्या गैरहजर आहेत.

याविषयी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंकजा मुंडे यांची तब्येत ठिक नाही, त्यामुळे त्या येणार नाहीत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच पंकजा मुंडे यांना बैठकीचं निमंत्रण होतं, मात्र माझी तब्येत ठिक नाही, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी माझी परवानगी घेतली, त्यामुळे मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यांना 12 तारखेच्या कार्यक्रमाचीही तयारी करायची आहे, त्यामुळे 12 तारखेला त्यांची भेट होईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. यापूर्वी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे 12 डिसेंबरला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती.

त्यांनतर त्यावर पंकजा मुंडे यांनी, ‘माझ्या पक्षांतराची अफवा पसरवण्यात येत असल्याने मी व्यथित झाले आहे. मात्र, बंडखोरी माझ्या रक्तात नाही’, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच, 12 डिसेंबरच्या मेळाव्याबाबत समाजमाध्यमांवरील संदेशाचा विपर्यास करण्यात आला. मी भाजप सोडण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे मी दु:खी झाले, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती.

Visit : Policenama.com

You might also like