पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे दोघेही ‘करोडपती’, बहिण-भावात चुरशीची लढत, जाणून घ्या संपत्‍ती

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परळीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहते. या ठिकाणी बहीण-भावाच्या लक्षवेधी लढतीमध्ये कोण कोणावर मात करतो याची उत्सुकता सर्वांनाच असते. गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर बहीण-भावांची संपपत्ती बद्दल माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे या संपत्तीच्या बाबतीत त्याचे बंधू आणि राजकीय विरोधक असलेल्या धनंजय मुंडे याच्या पुढे आहेत.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तची माहिती विवरणपत्रात दिली आहे. या दोघांकडे कोट्यावधी रुपयांची मालमात्ता आहे. शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात 5 कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपयांची संपत्ती दाखवली आहे. तर धनंजय मुंडे यांनी 3 कोटी 65 लाख 61 हजार 244 रुपयांची संपत्ती दाखवली आहे. त्यामुळे संपत्तीच्या बाबतीत बहीणच भावावर वरचढ ठरली आहे.

शपथपत्रानुसार पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन नाही. परंतु त्यांच्याकडे 450 ग्रॅम सोने आणि 4 किलो चांदी, दीड लाख रुपयांचे जडजवाहीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर त्यांचे पती चारुदत्त पावले यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 25 लाख 40 हजार रुपयांची BMW गाडी आहे. पंकजा मुंडे यांनी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांच्यावर एकही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल नाही.

धनंजय मुंडे यांच्यावर विविध आंदोलने तसेच संत जगमित्र साखर कारखाना अशा प्रकरणातील नऊ गुन्हे दाखल आहेत. धनंजय मुंडे यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत. शेअर्स आणि शेतीमध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर 3 कोटी 65 लाख 61हजार 244 रुपये जंगम तर 1 कोटी 14 लाख 90 हजार 522 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे 2 कोटी 20 लाख 90 हजार 964 रुपयांची जंगम आणि 25 लाख 14 हजार 635 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.