गणेश चतुर्थीच्या दिवशी पंकजा मुंडेंची मोठी घोषणा ! म्हणाल्या… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – परदेशवारी झाल्यावर परत आल्यानंतर, कोरोना संकट दूर झाल्यानंतर जनजीवन सुरळीत होईल तेव्हा पुन्हा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणं, ताकदीनं समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सक्रीय राजकारणापासून गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे दूरच आहेत. अशात आता पुन्हा एकदा नव्यानं राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

खूप दिवसांनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी काही दिवस परदेशात जावं लागणार आहे. तिथून आल्यानंतर नव्यानं सुरुवात करणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. यानंतर त्या पक्षात जास्त सक्रिय दिसल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी 12 डिसेंबर रोजी पंकजांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. एकनाथ खडसेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना खडसेंनी भाजपवर टीका केली होती. खडसेंसोबतच पंकजा मुंडेही पक्षात नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती.

काही दिवसांपूर्वीच भाजपनं जाहीर केलेल्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे, तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.