‘नौटंकी’ म्हणणाऱ्या खा. इम्तियाज जलील यांना पंकजा मुंडेंचे ‘प्रत्युत्तर’, म्हणाल्या…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या लाक्षणिक उपोषणावरून एमआयएमचे नते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला असून त्यांनी भाजप नेते उपोषण करून नौटंकी करत असल्याचा आरोप केला.

खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आम्ही सत्तेत असताना देखील खूप कामे केली आहेत. आजचे उपोषण हे मराठवाड्याच्या जनतेच्या पाणी प्रश्नासाठी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी त्याचे स्वागत करायला पाहिजे. स्वागत करता येत नसेल तर कमीत कमी टीका तरी करून नये असा टोला त्यांनी लगावला. मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आमच्या सरकारने कामे केलीच, तसेच या सरकारने मराठवाड्याचे प्रलंबीत प्रश्न तातडीने मार्गी लावावीत या मागणीसाठी हे लाक्षणिक उपोषण असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

इम्तियाज जलील काय म्हणाले ?
पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद मधील लाक्षणिक उपोषणावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, काही राजकीय नेत्यांना जनता मूर्ख असल्याचे वाटत आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांकडून औरंगाबादमध्ये होत असलेले उपोषण. सत्ता असताना मराठवाड्यातील पाणी सोडवता आला नाही. मात्र आता उपोषण करून ‘नौटंकी’ करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार देखील नाटक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.