MPSC परीक्षेवरुन पंकजा मुंडेंचे सरकारला ‘आवाहन’, धनंजय मुंडे यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेच्या जाहिरातीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी यातील त्रुटी लक्षात आणून देण्यासाठी आपल्या फेसबूक अकाऊंटवर ही जाहिरात शेअर केली आहे. याशिवाय त्यांनी सरकारला यात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. पंकजा मुंडे यांच्या या फेसबूक पोस्टची दखल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेत स्पष्टीकरण दिले आहे, याशिवाय नव्या जाहिरात प्रसिद्धी बदद्ल गृहमंत्र्यांनी चर्चा करुन असे सांगितले आहे.

एमपीएससीद्वारे पूर्व परिक्षा 2020 साठी जाहिरात क्रमांक 05/20 पोलीस उप निरीक्षक गट-ब (अराजपत्रित) PSI पदाच्या 650 पद भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. शासन निर्णयाप्रमाणे भ.ज-ड प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठी 2% जागा राखीव असतांना भ.ज-ड (NT-D) प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित दाखवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संतापजनक प्रतिक्रिया आहेत.

यासंदर्भात सरकार ने तात्काळ लक्ष घालावे व झालेला अन्याय दूर करणेसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, असे पंकजा मुंडे यांनी म्हणले होते. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही आपल्या फेसबुक पोस्टवरुन पंकजा मुंडे यांच्या प्रश्नाचे अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे यावर म्हणाले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय भरती प्रक्रियेत एनटी-ड प्रवर्गावरील अन्याय दूर व्हावा, यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत येत्या 2 दिवसात तातडीने बैठक घेत शासन निर्णयाप्रमाणे या प्रवर्गासाठी 2% जागा आरक्षित करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती करणार असल्याचे धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय एनटी-डी(भ.ज-ड) संवर्गातील अनेक विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास व भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची तयारी करत आहेत. महाविकासआघाडी सरकार या संवर्गातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या मेहनतीला न्याय देईल हा माझा विश्वास आहे असेही ते म्हणाले.